लंडन : विराट कोहलीच्या टीम इंडियाने ब्रिस्टलच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर 2-1 अशी मात केली. शिवाय इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच, तर सलग सहावी मालिका जिंकण्याचाही विक्रम केला.

दरम्यान, तीन सामन्यांच्या मालिकेत भारताचा आतापर्यंत कधीही पराभव झाला नाही. हा विक्रम कायम राखत भारताने आठवी मालिका जिंकली.

या सामन्यात इंग्लंडने भारताला विजयासाठी 199 धावांचं भलंमोठं आव्हान दिलं होतं. रोहित शर्माने ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या कारकीर्दीतलं तिसरं शतक ठोकून भारताला हा सामना आणि मालिका जिंकून दिली.

रोहितने 56 चेंडूंत अकरा चौकार आणि पाच षटकारांसह शतक साजरं केलं. विराट कोहलीने 43 आणि हार्दिक पंड्याने नाबाद 33 धावांची खेळी उभारली. रोहित शर्माने या शतकी खेळीसह टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी नवा इतिहास रचला आहे.

वन डेमध्ये तीन द्विशतकं ठोकणारा रोहित शर्मा एकमेव फलंदाज आहेच, मात्र टी-20 मध्ये तीन शतकं ठोकणारा तो कुलिन मुन्रोनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतक ठोकणारा जगात रोहित शर्माव्यतिरिक्त एकही फलंदाज नाही. वन डेतील 264 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

संबंधित बातम्या

रोहित शर्माचं वादळी शतक, भारताने टी-20 मालिका जिंकली 

भारतीय अ संघाच्या खेळीने कोलकाता कसोटीची आठवण