Rohit Sharma : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि समस्त मराठी मनाचा हुंकार आणि ज्वाज्वल्य इतिहासानं गेल्या साडेतीनशे वर्षापासून प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, "तुमची मान कधीही झुकवू नका ती नेहमी ताठ ठेवा." आणि हो टीम इंडियाचा सरसेनापती हिटमॅन रोहित शर्मानं (Rohit Sharma) सुद्धा तेच केलं जी महाराष्ट्राची माती करायला सांगते, प्रेरणा देते, लढायला सांगते. सेनापती लढतो, तेव्हा सैन्य चवताळून शत्रूवर तुटून पडायला मागेपुढं पाहत नाही, पण सेनापती पडल्यास काय होतं हे पानिपत सांगून जाते.
वर्ल्डकपच्या पहिल्याच साखळी सामन्यात प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळून मोहिमेचा प्रारंभ केल्यानंतर टीम इंडियाचा वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत स्वप्नवत असाच प्रवास होता. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध नको असणाऱ्या काही चुका अनपेक्षित झाल्या आणि 12 वर्षांचं स्वप्न दिवास्वप्न होऊन गेलं. टीम इंडियाची दहा सामन्यातील कामगिरी लौकिकाला साजेसा असाच होता. मात्र, एका सामन्यातील पराभवावरुन टीम इंडिया आणि सरसेनापती रोहित शर्माला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं शोभा देत नाही. ज्या क्षणासाठी वाट पाहिली तो क्षण अनुभवण्याचा, तो सोहळा अनुभवण्याचं स्वप्न जसं रोहितच्या नेतृत्वातील टीम इंडियाचं होतं ते 140 कोटींच्या या खंडप्राय देशातील चाहत्यांचे होते. हक्काचा रविवार आपल्या शिलेदारांवर ओवाळून टाकण्यासाठी ते आतूर होते. मात्र, निराशा पदली पडली.
समोरून लढतो तोच सरसेनापती
वयाच्या छत्तीशीमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळत असलेला हिटमॅन रोहित हा वर्ल्डपमध्ये आणि सर्व कर्णधारांच्या तुलनेत वर्ल्डकपच्या इतिहासात सुद्धा असेल असा आक्रमक दिसून आला. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भलेही त्याला फलंदाजीत अपयश आलं, पण सामना जिंकला. मात्र, त्यानंतर त्याने टीम इंडियाला धुवाँधार सुरुवात करून देण्याची जबाबदारी लिलया पार पाडली. ज्याठिकाणी किंग कोहलीनं चारशेवर धावा पळून काढून चिकाटी दाखवली त्याच ठिकाणी सलामीला रोहितनं तुटून पडत चौकार आणि षटकारांची आतषबाजी करून प्रत्येक सामन्यात विरोधी संघाची हवा काढून घेतली.
तर वैभव ही सामान्य मनाची शिकार बनली असती
रोहितच्या धडाक्यानं संधीच सलग 10 सामन्यात मिळाली नाही, त्यानंतर इतर फलंदाजांना स्थिरावण्यासाठी वेळ घेऊनही धावगतीवर फरक पडला नाही. फायनलमध्येही त्यानं तीच कामगिरी केली, पण एक फटका त्याला नडला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया सुद्धा नडला आणि त्यानंतर टीम इंडिया फायनलमध्ये पुनरागमन करू शकली नाही. महान लढवय्या नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, “युद्धाची कला ही जोखीम टाळण्याची कला नसती तर वैभव ही सामान्य मनाची शिकार बनली असती.... मी सर्व गणिते केली आहेत; बाकीचे नशीब करेल." त्याच्या पुढे जाऊन नेपोलियन बोनापार्ट म्हणतो, "धैर्य नकली असू शकत नाही. हा एक सद्गुण आहे जो ढोंगीपणापासून दूर जातो.” त्यामुळे महामुकाबल्यात घेतलेल्या भूमिकेबद्दल चर्चा होत राहिलं, पण त्यानं सेनापती म्हणून घेतलेली भूमिका योग्यच होती, यात शंका नाही.
टीका होऊनही श्रेयसच्या मागे खंबीरपणे उभा राहिला
पहिल्या तीन सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरकडून अपेक्षित कामगिरी आणि कच्चे दूवे समोर येऊ लागल्यानंतर श्रेयसवर आणि रोहितवरही शंका उपस्थित होऊ लागली. ज्या शाॅर्ट चेंडूवर श्रेयस अडखळत होता, म्हणून त्याला बाजूला न करता लढण्याचा सल्ला दिला. त्याला त्याच शाॅर्ट चेंडूवर मेहनत करून तुटून पडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर श्रेयसने केलेली कामगिरी सर्वांसमोर आहे. मात्र, श्रेयसच्या मागं खंबीरपणे उभं राहणारा सरसेनापती रोहित होता. त्याने धावा नाही केल्या, तरी त्याला संघात घ्यायला आवडेल, असं जाहीरपणे सांगत त्याच्याकडून कामगिरी करून घेतली.
कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून साजेशी कामगिरी
नेता तोच असतो जो समोर येऊन लढत असतो, धैर्याची व्याख्या नव्याने करतो. तेच या स्पर्धेत रोहितनं नेतृत्व करताना फलंदाजीमध्येही दाखवून दिलं. कॅप्टन म्हणून वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा मान रोहितनं मिळवला. त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत 597 धावांचा पाऊस पाडला. फक्त रोहितच नाही, तर टीम इंडियाच्या सर्वच शिलेदारांनी वैयक्तिक कामगिरी सर्वोत्तम केली. मोहम्मद शमी (24 विकेट), बुमराह (20 विकेट), सिराज (14 विकेट), जडेजा (16 विकेट), कुलदीप यादव (14 विकेट) विराट कोहलीच्या विश्वविक्रमी 765 धावा, श्रेयस अय्यर (530 धावा) राहुल 452 धावा अशी दमदार कामगिरी झाली.
वर्ल्डकप आला नाही, पण बरंच काही दिलं!
ज्या टीम इंडियाच्या धुरंदरांनी बाजी लावून फायनलपर्यंत बाजी मारली त्यामध्ये इतर संघ तुलनेतही नव्हते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंदाज चुकला असेल. त्याची कारणमीमांसा सुद्धा केली जाईल, पण या स्पर्धेनं अनेक मोहरे सुद्धा दिले आहेत. पहिलाच वर्ल्डकप खेळणारा शुभमन गिल, श्रेयस अय्यर दिले. जी गोलंदाजी कमकुवत वाटत होती, त्याची दहशत वाटू लागली. जे रोहितनं केलं, ते पाहता भविष्यातही नेतृत्व करणाऱ्याला प्रेरणा मिळेल यात शंका नाही.
सल असेल ती फक्त कोहली आणि रोहितची
टीम इंडियाचं वर्ल्डकपमधील सर्वात मोठं बलस्थान हे किंग कोहली आणि कॅप्टन रोहित होता. दोन वाघांची मैदानातील डरकाळी विरोधी संघांना घाम फोडणारी होती. ज्या टीम इंडियाला 2013 पासून आयसीसी स्पर्धेत हुलकावणी दिली, ती या दोन वाघांमुळे 2023 मध्ये भरून निघेल, अशी कोट्यवधी भारतीयांची अपेक्षा होती. वर्ल्डकप भविष्यातही जिंकला जाईल, पण ज्यांनी मशागत केली, जमीन पोषक केली आणि अखेरच्या क्षणी आलेला घास दूर निघून गेला याची सल सर्वाधिक किंग कोहली आणि रोहितला असेल.
दोन्ही वाघ क्रिकेटच्या वयामध्ये उत्तरार्धात आहेत, त्यामुळे दोघांसाठी ही अखेरची संधी होती. रोहित 2011 वर्ल्डकप टीमचा भाग नव्हता, त्यामुळे विश्वविजयाला मुकला होता. त्यावेळी मात्र कोहली होता. त्यानंतर 2019 मध्ये किंग कोहली संघाचे नेतृत्व करत होता. मात्र, सेमीफायनलमध्ये स्वप्न भंगले. त्यामुळे 2023 मध्ये दोघं मिळून चमत्कार करतील, अशी आशा होती, पण दोघांच्या नशीबी पुन्हा निराशा आली. विश्वविक्रमी शतकाची नोंद झाली, पण विश्वविजेता होऊ शकलो नाही, वर्ल्डकपचा मानकरी झालो, पण वर्ल्डकप उंचावू शकलो नाही, ही सल क्रिकेटच्या राजाला म्हणजेच किंग कोहलीला आणि राजा सोबत असूनही अखेरच्या टप्प्यात निर्णायक ठोका देऊ शकलो नाही, याची खंत रोहितच्या मनात असेल.
दोघांचा दाटून कंठ पाहता क्रिकेटच्या क्षितिजावरुन दूर होतील तेव्हा एकांतात त्यांना सल नक्कीच कुरडत राहील यात शंका नाही. तेंडुलकरने 1992 पासून 2011 पर्यंत वाट पाहिली, पण घरच्या मैदानात वर्ल्डकप उंचावून मिरवण्याचा मान मिळाला. मात्र, कॅप्टन रोहितसाठी सर्व काही मिळवलं, पण तो सोनेरी क्षण अनुभवता आला नाही, याचीही खंत वाटून राहील यात शंका नाही. त्याचे अश्रु हेच सांगण्याचा प्रयत्न करत होता. नेपोलियन म्हणून गेला आहे, "मरण्यापेक्षा दु:ख सोसण्यासाठी जास्त धैर्य लागते." इथं मरणं नाही, पण जिंकलो नाही हे दु:ख पचवण्यासाठी रोहितला सर्वाधिक धैर्य लागेल, हे सुद्धा तितकंच खरं.