तेव्हा लग्नाच्या, तर आता बायकोच्या वाढदिवसाचं गिफ्ट
एबीपी माझा वेब टीम | 22 Dec 2017 11:29 PM (IST)
एकाच ओव्हरमध्ये चार षटकार ठोकण्याचा पराक्रमही केला. एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो 118 धावांवर बाद झाला.
इंदूर : श्रीलंकेविरुद्ध तुफान फॉर्मात असलेला कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या टी-20 सामन्यातही जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने अवघ्या 35 चेंडूत विक्रमी शतक झळकावलं. एकाच ओव्हरमध्ये चार षटकार ठोकण्याचा पराक्रमही केला. एक मोठा फटका मारण्याच्या नादात तो 118 धावांवर बाद झाला. रोहित शर्माने मोहालीत कारकीर्दीतलं तिसरं वन डे शतक ठोकलं होतं. तर इंदूरमध्ये टी-20 कारकीर्दीतलं दुसरं शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे हे दोन्ही विक्रम केले तेव्हा त्याची पत्नी रितीका सामना पाहण्यासाठी उपस्थित होती. यावेळीही रितीका त्याच्यासाठी लकी ठरली. या विक्रमात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, रोहितने द्विशतक ठोकलं तेव्हा त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. तर आज त्याने शतक पूर्ण केलं त्याच्या एक दिवस अगोदरच त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्याने हे शतक पूर्ण करत पत्नीला जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. भारताची मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी रोहित शर्माने या सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. 43 चेंडूत 118 धावा करुन तो बाद झाला. त्याच्या सोबत सलामीला आलेल्या केएल राहुलनेही फटकेबाजी करत 89 धावा केल्या. भारताने हा सामना 89 धावांनी जिंकला. इंदूरच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेवर 88 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. रोहित शर्माच्या विक्रमी शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर 261 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाला 17.2 षटकांत सर्वबाद 172 धावांची मजल मारता आली. श्रीलंकेकडून उपुल थरंगा आणि कुशल परेरानं दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यजुवेंद्र चहलनं थरंगाला बाद करत टीम इंडियाच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर कुलदीप यादवनं कुशल परेरासह तीन फलंदाजांना माघारी धाडत भारताचा मालिका विजय साजरा केला. तर यजुवेंद्र चहलनं 52 धावांत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.