मुंबई : ग्रासकोर्टचा बादशाह रॉजर फेडरर विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा लाखो चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं त्याच्या डोक्यावर होतं. पुरुष एकेरीत आठवं विम्बल्डन जेतेपद पटकावून फेडररने विक्रम रचला आहे. फेडररच्या या विजयामुळे त्याचा एक चाहता चांगलाच मालामाल झाला आहे.


फेडररच जिंकणार या विश्वासाने त्याच्यावर तब्बल 50 हजार युरो म्हणजे सुमारे 36 लाख रुपयांची पैज लावणाऱ्या चाहत्याला घसघशीत रक्कम मिळाली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या जॉर्जला 36 लाखांची पैज जिंकल्यामुळे 1 लाख 62 हजार युरो म्हणजेच 1 कोटी 19 लाख 41 हजार रुपये मिळाले आहेत.

जॉर्ज हा एका टेक कंपनीचा हेड आहे. फेडररने विम्बल्डनची ट्रॉफी आठव्यांदा उचलावी यासाठी त्याने देव पाण्यात ठेवले होते, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या रकमेची पैज लावल्याचं त्याने आपल्या गर्लफ्रेण्डलाही सांगितलेलं नव्हतं.

फेडररने सॅम्प्रसचा रेकॉर्ड मोडला, आठव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद


'माझी गर्लफ्रेण्ड फारशी टेनिस पाहत नाही. त्यामुळे तिला याची कल्पना दिलेली नाही. मी फारशा पैजा लावत नाही. पण जेव्हा बेट लावतो, तेव्हा ती जिंकेन याची खात्री असेल तरच. खरं तर आम्ही मित्र जमलो होतो. तेव्हा फेडररची खेळी पाहून माझी खात्री पटली की हा यंदाचं विम्बल्डन जेतेपद पटकावणारच.' असं जॉर्ज मॅचपूर्वी म्हणाला होता. या मोसमात फेडररने तीन विजेतेपदं मिळवल्यामुळे जॉर्जचा आत्मविश्वास दुणावला होता.

ग्रासकोर्टचा बादशाह अशी बिरुदावली मिरवणाऱ्या रॉजर फेडररने विम्बल्डनच्या अखेरच्या फेरीत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली आहे. विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये क्रोएशियाच्या मरिन सिलिचवर मात करुन फेडररने आठव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे.

हे जेतेपद पटकावून फेडररने विम्बल्डन स्पर्धेचा ताज सर्वाधिक वेळा मिळवण्याचा विक्रम रचला आहेे. यापूर्वी पीट सॅम्प्रसच्या सात वेळा विम्बल्डन जिंकण्याच्या विक्रमाशी फेडररने बरोबरी केली होती. मात्र आठवं विजेतेपद पटकावून त्याने सॅम्प्रसचा विक्रम मोडित काढला आहे.

फेडररने अकराव्यांदा विम्बल्डनची फायनल गाठली आहे. 2012 नंतर पाच वर्षांनी त्याला विम्बल्डनचं जेतेपद मिळालं आहे.

फेडरर खेळत असलेली ही 29 वी ग्रँडस्लॅम फायनल आहे. विम्बल्डनची अंतिम फेरी खेळणारा फेडरर हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडरर 35 वर्षांचा आहे. यापूर्वी केन रोसवेलने 39 व्या वर्षी विम्बल्डनची फायनल खेळली होती.