Roger Federer: रॉजर फेडरर... टेनिस कोर्टचा बादशाह... यंदा विम्बल्डनच्या मैदानात फेडरर पहिल्यांदाच रॅकेटशिवाय उतरला. आपल्या लाडक्या रॉजरला पाहून प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. फेडरर मैदानात येताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं स्वागत केलं. विम्बल्डनच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरुन रॉजर फेडररचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोसोबतच त्याला देण्यात आलेलं कॅप्शन खरंच लक्ष वेधून घेणारं आहे. 'थलायवा' असं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.
निवृत्तीनंतर पहिल्यांदाच विम्बल्डनमध्ये पोहोचलेल्या रॉडर फेडररचं त्याच्या चाहत्यांनी जबरदस्त स्वागत केलं. 20 वेळा ग्रँडस्लॅमवर नाव कोरणाऱ्या रॉजर फेडररनं गेल्या वर्षी निवृत्ती घेतली. फेडररनं 8 वेळा विम्बल्डनमध्ये ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. त्यामुळे त्याच्या आगमनानंतर सामना सुरू होण्यापूर्वी रॅकेटशिवाय मैदानात उतरणाऱ्या फेडररचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. शिवाय स्क्रीनवर फेडररचे काही व्हिडीओ देखील दाखवण्यात आले. यावेळी पंधरा हजार प्रेक्षकांनी फेडररला मानवंदना दिली.
दरम्यान, रॉजर फेडररनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लेबर कपनंतर टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली होती. यानंतर तो पहिल्यांदाच विम्बल्डनच्या मैदानात आला होता. पण हा क्षण फेडररसाठी अत्यंत खास होता. कारण फेडरर ज्या मैदानात आला होता, त्याच मैदानात त्यांनं आपल्या आयुष्यातलं पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं होतं.
आठ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडरर प्रेक्षक म्हणून विम्बल्डनच्या सेंट्रल कोर्टवर पोहोचला, तेव्हाचं दृश्य डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. जेव्हा रॉजरनं रॉयल बॉक्समध्ये प्रवेश केला, तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या खेळाडूचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. तब्बल दीड मिनिटं संपूर्ण सेंट्रल कोर्ट टाळ्यांच्या कडकडाटानं गजबजलं होतं.
रॉजर फेडररसोबत रॉयल बॉक्समध्ये त्यावेळी त्याची पत्नी मिर्का आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स केट होत्या. एका क्षणी, टाळ्या थांबणार नाहीत असं वाटत असताना, केटनं रॉजरला खाली बसण्याचा इशारा केला. रॉजर खाली बसल्यानंतर टाळ्या थांबल्या.
दरम्यान, ऑल इंग्लंड क्लबमध्येच फेडररनं कारकिर्दीतील शेवटचा सामनाही खेळला. 2021 मध्ये, हुबर्ट हुरकाजकडून उपांत्यपूर्व फेरीतील पराभव त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.