स्वित्झर्लंड :  स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू आणि 19 ग्रॅन्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणाऱ्या रॉजर फेडररला अमेरीकन ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. अर्जेन्टीनाच्या ज्युआन मार्टीन डेल पोट्रोनं फेडररचं आव्हान संपुष्टात आणलं. 2 तास 50 मिनिटं चाललेल्या या लढतीत डेल पोट्रोनं फेडररला 7-5, 3-6, 7-6, 6-4 अशी मात दिली.

रॉजर फेडररनं यंदाच्या विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलिन ओपन ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपदांवर आपलं नाव कोरलं होतं. मात्र 28 वर्षीय डेल पोट्रोनं या सामन्यात चार सेट्स मध्येच फेडररचं आव्हान मोडीत काढलं. आता उपांत्य फेरीत डेल पोट्रोची लढत स्पेनच्या अग्रमानांकित राफेल नदालशी होणार आहे.

फेडररला सुरुवातीपासूनच अमेरिकन ओपन टूर्नामेंटमध्ये आपलं स्थान टिकवण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला होता. त्याने यापूर्वी अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोचा पाच सेटमध्ये 4-6, 6-2, 6-2, 1-6, 6-4 असा कडवा संघर्ष करुन विजय मिळवावा लागला होता.

यानंतर रशियाच्या मिखाईल यूझनीला पाच सेटमध्ये 6-1, 6-7, (3/7), 4-6, 6-4, 6-2, ने पराभव करण्यात यश मिळाले होते.