मुंबई : आयपीएलच्या रणांगणात चौखूर उधळलेला मुंबई इंडियन्सचा अश्वमेध अखेर रायझिंग पुणेनंच रोखला. वानखेडेवरच्या आजच्या सामन्यात पुण्यानं मुंबईवर तीन धावांनी मात केली आणि मेन्टॉर सचिन तेंडुलकरला विजयाचं बर्थ डे गिफ्ट देण्याचा रोहित शर्माचा बेत हाणून पाडला. आयपीएलच्या रणांगणात मुंबई इंडियन्सचा सलग सहा विजयांनंतर हा पहिलाच पराभव ठरला.
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी पुण्याला सहा बाद 160 धावांत रोखलं होतं. पण पुण्याच्या गोलंदाजांनी त्यापेक्षा सरस कामगिरी बजावून मुंबईला आठ बाद 157 धावांत रोखलं. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं 39 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 58 धावांची खेळी केली. पण त्याची झुंज अपयशी ठरली.
पुण्याकडून जयदेव उनाडकट आणि बेन स्टोक्सनं प्रत्येकी 2-2 विकेट्स काढल्या. त्याआधी, अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठीनं दिलेल्या 76 धावांच्या सलामीनंतरही, मुंबईच्या गोलंदाजांनी पुण्याला 20 षटकांत सहा बाद 160 धावांत रोखलं होतं.
रहाणेनं 32 चेंडूंत 38 धावांची, तर त्रिपाठीनं 31 चेंडूंत 45 धावांची खेळी केली. पण त्यानंतर पुण्याच्या फलंदाजांना धावांची गती वाढवता आली नाही. त्यामुळं मुंबईसमोर विजयासाठी 161 धावांचं लक्ष्य होतं. पण पुण्याच्या गोलंदाजांनी मुंबईला ते लक्ष्यही गाठू दिलं नाही.