रिओ दि जनैरो : जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट पुन्हा एकदा वेगाचा अनभिषिक्त सम्राट ठरला आहे. पृथ्वीवरचा सर्वात वेगवान माणूस अशी ख्याती असलेल्या बोल्टनं 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
बोल्टनं ही शर्यत 9.81 सेकंदात पूर्ण केली, तर अमेरिकेच्या जस्टिन गॅटलिननं 9.89 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकावर नाव कोरलं. उसेन बोल्टचं 100 मीटर शर्यतीतलं हे तिसरं सुवर्णपदक ठरलं.
बोल्टच्या खात्यात आता ऑलिम्पिकमधील सात सुवर्णपदकं जमा झाली आहेत. बोल्टनं 2008 सालच्या बीजिंग आणि 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर्स, 200 मीटर्स आणि फोर बाय हंड्रेड मीटर्स रिले या तिन्ही शर्यतींची सुवर्णपदकं पटकावली होती.