हैदराबाद: बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला. यानंतर मायदेश परतल्यानंतर तिचे सर्वत्र जंगी स्वागत झाले. शनिवारी तिने हैदराबादमधील महाकाली मंदिरात जाऊन देशन घेत, पारंपरिक पद्धतीने पूजा केली. महाकालीचे दर्शन घेण्यासाठी तिने पारंपारीक पद्धतीची साडी परिधान केली होती. तसेच तिने यावेळी डोक्यावर 'बोनम' (पूजेचे समान) घेऊन मंदिरात प्रवेश केला.


 

यावेळी तिने आपण दरवर्षी महाकालीच्या दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले. '' रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली, तर मी दर्शन घेऊन मनोभावे पूजा करेन, असे साकडे घातले होते. त्यानुसारच आज मी येथे दर्शनासाठी आणि पूजेसाठी आले,'' असे तिने सांगितले.

 

सिंधूने गेल्या महिन्यात रिओ ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी 'बोनालू' महोत्सवात सहभाग घेतला. 'बोनालू' हा तेलंगणाचा परंपरिक उत्सव असून हा उत्सव तेलंगणाच्या निर्मितीपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

 

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिंधूला पाच कोटी रुपये तसेच एक हजार एकर जमीन पुरस्कार स्वरुपात दिला. तसेच तिला राज्य सरकारच्यावतीने शासकीय सेवेत सामावून घेण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.

 

तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनीही सिंधूला तीन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये घर आणि शासकीय सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव दिला आहे.