रिओ दि जनैरो : भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक थोडक्यात हुकलं. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात दीपानं कमालीची कामगिरी बजावून चौथ्या स्थानावर झेप घेतली.
अवघ्या 0.15 गुणांनी दीपाला कांस्यपदकाने हुलकावणी दिली. दीपानं व्हॉल्ट प्रकारात 15.066 गुणांची कमाई करुन चौथं स्थान मिळवलं. स्वित्झर्लंडच्या गिलिया स्टेनग्रुबरनं 15.216 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली.
आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारात दीपानं पहिल्या प्रयत्नात सुकाहारा व्हॉल्ट सादर केला आणि 14.866 गुण मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात दीपाच्या प्रोडुनोव्हा व्हॉल्टला पंचांनी 15.266 गुण दिले. दीपानं एकूण 15.066 गुणांसह चौथं स्थान मिळवलं. दीपानं चौथं स्थान मिळवलं तेही अमेरिकेची स्टार जिम्नॅस्ट सिमोन बाईल्स आणि रशियाची मारिया पासेका यांसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात.
दीपा कर्माकर ही ऑलिम्पिकच्या इतिहासात फायलनमध्ये धडक मारणारी पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली होती. तसंच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवणारी ती पहिली महिला जिम्नॅस्ट होती. त्यामुळे भारताला दीपाकडून मोठी अपेक्षा होती. त्रिपुरासारख्या ईशान्य भारतातल्या छोट्या राज्यापासून रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये चौथ्या स्थानापर्यंत दीपानं मारलेली झेप पदकाइतकीच मोठी आहे.
दीपा कर्माकरनं रिओ ऑलिम्पिकमध्ये बजावलेल्या कामगिरीनंतर देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रानं ट्विटरवर 'यू आर माय हिरो' असं म्हणत दीपाचं कौतुक केलं, तर राजवर्धनसिंग राठोडनंही दीपा तुझा खूप अभिमान वाटतो असं म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दीपानं बजावलेली ऐतिहासिक कामगिरी, भारतीय जिम्नॅस्टिक्ससाठी नवी पहाट ठरावी अशीच आशा.