रिओ दी जनैरो : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि बा प्रार्थना ठोंबरे जोडीचं ऑलिम्पिकमधलं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे. चीनच्या शुई पेन्ग आणि शुई झॅन्ग जोडीनं सानिया-प्रार्थना जोडीवर 7-6, 5-7, 7-5 असा तीन सेट्समध्ये विजय मिळवला असून भारताचा टेबलटेनिसपटू शरद कमलही रिओ ऑलिम्पिकमधून पहिल्याच फेरीत बाद झाला आहे.
सानिया-प्रार्थना जोडीनं दोन तास आणि 44 मिनिटं चाललेल्या या सामन्यात पहिला सेट टायब्रेकरमध्ये गमावला आहे. पण दुसरा सेट जिंकून त्यांनी जबरदस्त कमबॅक केलं. मात्र तिसऱ्या सेटमध्येही सानिया-प्रार्थना जोडीनं अनेक चुका केल्या. त्यामुळे त्यांना आपला गाशा पहिल्याच फेरीत गुंडाळावा लागला आहे.
तसेच रोमानियाच्या अॅड्रियन क्रिसननं शरद कमलवर 11-8, 14-12, 9-11, 11-6, 11-8 असा सहज विजय मिळवला. अॅड्रियन क्रिसनसमोर शरद कमल केवळ 38 मिनिटंच टिकाव धरु शकला. शरद कमलच्या या पराभवामुळं रिओ ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमधलं भारताचं आव्हानही संपुष्टात आले आहे. याआधी भारताच्या सौम्याजित घोष, मनिका बत्रा आणि मौमा दास यांनाही पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला आहे.