नाशिक : मनमाड पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी एका सैराट जोडप्याचं लग्न लावून दिलं. कुटुंबीयांच्या विरोधामुळे दोन दिवसांपूर्वी प्रेमी युगुल घरातून पळून गेलं होतं. मात्र त्यांनी आज थेट पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली. त्यानंतर पोलिसांच्या साक्षीने त्यांचा विवाह संपन्न झाला.
काय आहे प्रकरण?
मनमाडमधील आनंदवाडी परिसरातील राहणारे किरण आणि पूजा यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पूजा नांदगाव इथे आयटीआयमध्ये शिकते, तर किरण मनमाड रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ विकतो. मात्र पूजाच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता.
पूजाचा बुधवारी शेवटचा पेपर होता. पेपर झाल्यानंतर किरण आणि पूजा दोघे फरार झाले. यानंतर पोलिसांत दोघेही बेपत्ता असल्याची नोंद झाली.
मात्र दोन दिवसानंतर हे दोघे स्वत:हून पोलिसात हजर झाले. आम्हाला लग्न करायचे आहे पण घरच्यांचा विरोध असल्याचं मुलीने पोलिसांना सांगितले. दोघे सज्ञान असल्याने पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना बोलवून घेतले. मुलाच्या घरचे तयार होते, मात्र मुलीच्या आईचा विरोध होता. मात्र पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांची समजूत काढली आणि दोन्हीकडील मंडळी लग्नासाठी तयार झाले.