नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा हे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले आहेत. रजत शर्मा यांनी माजी क्रिकेटपटू मदनलाल यांना पराभूत करुन आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली.
शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलने दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. रजत शर्मा यांच्या पॅनेलने बारापैकी बारा जागा जिंकल्या. त्यापैकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रजत शर्मा यांनी भारताचे माजी कसोटीपटू मदनलाल यांचा 527 मतांनी पराभव केला. शर्मा यांना 1531, मदनलाल यांना 1004 आणि विकास सिंह यांना 232 मतं मिळाली.
शर्मा आणि त्यांच्या पॅनेलचा निर्विवाद विजय हा बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सीके खन्ना आणि त्यांच्या गटाला धक्का मानला जात आहे. कारण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राकेश बंसल यांनी सीके खन्ना यांच्या पत्नी शशी यांचा 278 मतांनी पराभव केला. राकेश बंसल यांना 1364 मतं मिळाली तर शशी खन्ना यांना 1086 मतं मिळवता आली.
राकेश बंसल हे डीडीसीएचे माजी अध्यक्ष स्नेह बंसल यांचे धाकटे बंधू आहेत. या पराभवासोबत डीडीसीएमध्ये सीके खन्ना यांचा मार्ग बंद झाला आहे. सुमारे तीन दशकांपासून त्यांचं डीडीसीएवर वर्चस्व होतं.