सिंगापूर : सिंगापूरमधल्या एका फुटबॉल सामन्यादरम्यान नाणेफेकीवेळी अनोखा प्रकार समोर आला. प्रत्येक सामन्यात पंच दोन्ही संघांमध्ये नाणेफेक करतात. पण आर्सेनल आणि पॅरीस सेंट जर्मन संघांत झालेल्या या सामन्यात पंचांनी नाणेफेकीसाठी चक्क क्रेडिट कार्डचा वापर केला.

स्पर्धेचे प्रायोजक असलेल्या युनियन पे इंटरनॅशनल कंपनीनं जाहिरातीसाठी ही नामी शक्कल लढवली. नाणेफेकी दरम्यान क्रेडीट कार्डाचा वापर झाल्याची ही गोष्ट क्रीडा चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही. या घटनेनंतर काही क्षणातच सोशल मीडियावर या प्रसंगाचे फोटो व्हायरल व्हायला लागले.

महत्वाची गोष्ट अशी की नाणेफेकीवेळी आर्सेनलचा कर्णधार मेसूत ओझिलला हेड किंवा टेलऐवजी, कार्डचा सिरियल नंबर की दुसऱ्या बाजूला असलेला सीव्हीव्ही नंबर असं विचारण्यात आलं.

आर्सेनलनं या सामन्यात पीएसजीचा 5-1 असा धुव्वा उडवला. पण आर्सेनलच्या या कामगिरीपेक्षा  नाणेफेकीसाठी क्रेडिट कार्डच्या वापरल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये चांगलीच रंगली.