नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्ली कसोटीत द्विशतक झळकावून अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. सर्वाधिक द्विशतक ठोकणारा तो एकमेव कर्णधार बनला आहेच. शिवाय कर्णधार या नात्याने सर्वोच्च धावसंख्या उभारणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे.
या अगोदरही हा विक्रम त्याच्याच नावावर होता. 2016 साली विराटने 235 धावा केल्या होत्या. कर्णधार असताना एवढी धावसंख्या उभारणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार होता. त्याच्यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने 2013 साली 224 धावा केल्या होत्या.
कर्णधार असताना सचिन तेंडुलकरनेही 1999 साली 217 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या उभारणारा विराट पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने स्वतःच्याच 235 धावांचा विक्रम मोडीत काढला. दिल्ली कसोटीत विराटने 243 धावा केल्या.
सर्वाधिक द्विशतकं ठोकणारा विराट एकमेव कर्णधार
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीत सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा शानदार द्विशतक झळकावलं. या मालिकेतलं विराटचं हे सलग दुसरं, यंदाच्या वर्षातलं तिसरं तर कसोटी कारकीर्दीतलं एकूण सहावं द्विशतक ठरलं.
सर्वाधिक द्विशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट आता सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसोबत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर कर्णधार या नात्याने सर्वाधिक द्विशतक ठोकणारा विराट जगातला पहिला फलंदाज ठरला. त्याने ब्रायन लाराचा पाच द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला.
कर्णधार म्हणून ब्रायन लाराच्या नावावर 5, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन 4, ग्रॅमी स्मीथ 4 आणि मायकल क्लार्कच्या नावावर 4 द्विशतक आहेत.