ब्रिस्बेन : मेग लॅनिंगच्या ऑस्ट्रेलियन महिला संघानं आज ब्रिस्बेनच्या मैदानात एका नव्या विक्रमाची नोंद केली. ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा आज तब्बल 232 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियन महिलांचा हा वन डेतला सलग 21 वा विजय ठरला. या विजयासह या संघानं रिकी पॉन्टिंगच्या संघाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
ऑक्टोबर 2017 पासून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं एकही वन डे सामना गमावलेला नाही. 2017 च्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला वन डेत हरवलं होतं. पण त्यानंतर या संघानं एकदाही पराभवाचं तोंड पाहिलेलं नाही. 21 सामन्यांच्या या विजयी मालिकेत ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंड, पाकिस्तान, भारत आणि न्यूझीलंड या संघांना पराभवाची धूळ चारली आहे.
2003 साली पॉन्टिंगच्या फौजेची कमाल
रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलिय़न संघानं 2003 साली असाच दरारा निर्माण केला होता. या संघानं सलग 21 सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. ऑस्ट्रेलियन महिलांनी आज पुरुष संघाच्या त्याच विक्रमाशी बरोबरी साधली.
ऑस्ट्रेलियन महिलांचं वर्चस्व
मार्च महिन्यात झालेल्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकानंतर कोरोनामुळे महिला क्रिकेटही ठप्प होतं. पण सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरक्षित वातावरणात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेचं आयोजन करण्यात आलं. या दोन्ही मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियानं वर्चस्व गाजवलं. ट्वेन्टी ट्वेन्टीत ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 2-1 तर वन डेत 3-0 असा पराभव केला.