कीव (युक्रेन) : इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढ्य लिव्हरपूल संघाला धूळ चारत रिअल मॅड्रिडने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. रिअल मॅड्रिडने 3-1 ने लिव्हरपूलचा धुव्वा उडवून विजेतेपद पटकावलं.
युक्रेनची राजधानी कीवमध्ये चॅम्पियन्स लीग फुटबॉल सामन्याची अंतिम फेरी पार पडली. रिअल मॅड्रिडने जिंकलेला हा तेरावा युरोपिअन किताब आहे.
चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत फर्स्ट हाफमध्ये कोणत्याच संघाला गोल करण्यात यश आलं नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच लिव्हरपूलचा मेन स्ट्रायकर मोहम्मद सालह दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाला मोठा फटका बसला. मैदानावरुन माघारी जातानाच सालाहच्या डोळ्यात अश्रू तरळले.
51 व्या मिनिटाला रिअल मॅड्रिडच्या करिम बेन्झेमाने पहिला गोल केला. 55 व्या मिनिटाला लिव्हरपूलकडून सादिओ मेननं एक गोल झळकवल्याने सामना बरोबरीच्या वळणावर आला.
त्यानंतर गॅरेथ बेलच्या किकमुळे रिअल मॅड्रिडचा दुसरा गोल झाला. 83 व्या मिनिटाला आणखी एक गोल करुन बेलने रिअल मॅड्रिडला जेतेपद मिळवून दिलं. लिव्हरपूलच्या गोलकीपरच्या चुका संघाला भोवल्याचं पाहायला मिळालं.