मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर प्लेयर रवींद्र जाडेजाला विस्डनद्वारे भारताचा 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर' (एमव्हीपी) म्हणून घोषित केलं आहे. टीम इंडियासाठी रवींद्र जाडेजाचं फलंदाजी, गोलंदाजी आणि यष्टीरक्षण या तिन्हींमध्ये भरीव योगदान आहे. रवींद्र जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीचा अभ्यास केल्यानंतर विस्डनने रवींद्र जाडेजाची निवड केली आहे. जाडेजाने एमव्हीपी रेटिंगमध्ये एकूण 97.3 गुण मिळवले आहेत.


जाडेजाची एमव्हीपी रेटिंग आश्चर्यचकीत करणारी आहे, असं विस्डनसाठी माहिती गोळा करणाऱ्या क्रिकविज संस्थेच्या फ्रेडी वाईल्ड यांनी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, भारताचा फिरकीपटू गोलंदाज रवींद्र जाडेजाला याठिकाणी पाहून आश्चर्य वाटू शकतं. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला संघात फारशी संधी मिळत नाही. मात्र ज्यावेळी त्याला संघात स्थान मिळतं त्यावेळी त्याला गोलंदाजीसाठी निवडला जातं. तर त्याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं जातं. मात्र तिथेही त्यांची कामगिरी चमकदार आहे. सामन्यात जाडेजाचं नेहमीच योगदान असतं, असं फ्रेडी वाईल्ड यांनी म्हटलं.


रवींद्र जाडेजाची गोलंदाजीतील सरासरी 24.62 आहे, जी ऑस्टेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नच्या तुलनेत उत्तम आहे. तर फलंदाजीची सरासरी 35.26 आहे, जी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनपेक्षा चांगली आहे. याशिवाय 21 व्या शतकातील कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा करण्यासोबत 150 विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये जाडेजा गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये जगातील दुसरा सर्वोत्तम खेळाडू आहे.


रवींद्र जाडेजाला 97.3 एमव्हीपी रेटिंग मिळाली आहे. रवींद्र जाडेजाने 2012 पासून आजपर्यंत 49 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 1869 धावा केल्या असून यात एका शतकाचा समावेश आहे. याशिवाय जाडेजाने 213 विकेट्सही पटकावल्या आहेत. जगभरातील खेळाडूंमध्ये रवींद्र जाडेजा दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथैया मुरलीधरन आहे.