मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रविंद्र जाडेजा विजय हजारे चषकात शानदार शतक झळकावून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जाडेजाने झारखंडविरुद्ध 116 चेंडूत 113 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या याच खेळीमुळे आता आयपीएलमध्ये कर्णधार धोनी त्याच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवू शकतो

'द न्यू इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत जाडेजा असं म्हणाला की, 'धोनी भाईने मला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. शक्यतो आयपीएलमध्येही टीमसाठी मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो.'

जाडेजा आयपीएलच्या 11 व्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणार आहे. दोन वर्षानंतर आयपीएलमध्ये परतणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने जाडेजाला रिटेन केलं आहे.

'माझ्यात फलंदाजीचे गुण आहेत. त्यामुळे मी आता पार्टटाईम फलंदाज नाही. मला मोठ्या खेळी करायच्या आहेत. मी शेवटी येऊन 10 आणि 20 धावा कराव्या असं मला वाटत नाही. टीमसाठी मला एक मुख्य फलंदाजाची भूमिका बजावायची आहे.' असंही जाडेजा यावेळी म्हणाला.

जाडेजाने टीम इंडियासाठी 35 कसोटी, 136 वनडे आणि 40 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत त्याने 1176 आणि वनडेमध्ये 1914 धावा केल्या आहेत. तर टी-20 मध्ये 116 धावा केल्या आहेत.