नवी दिल्ली : श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर क्लीन स्विप दिल्यानंतर भारताचा मुकाबला आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बीसीसीआयकडे एक अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक तयार करताना खेळाडूंच्या विश्रांतीचाही विचार करावा, अशी मागणी रवी शास्त्री यांनी केली. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली प्रशासक समिती, बोर्डाचे सीईओ राहुल जोहरी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना रवी शास्त्रींनी ही मागणी केल्याची माहिती आहे.
सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंच्या फिटनेसवर परिणाम होतो, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला. त्यानंतर मार्चमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामन्यांची मालिका झाली. त्यानंतर मार्च आणि एप्रिलमध्ये आयपीएलमध्ये खेळाडू व्यस्त होते.
आयपीएलनंतर तातडीने भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना झाला. चॅम्पियन्स ट्रॉफी संपताच इंग्लंडहूनच भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाला. वेस्ट इंडिजमध्ये 5 वन डे आणि एक टी-20 सामना खेळवण्यात आला.
वेस्ट इंडिजहून परतताच भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 5 वन डे, 3 कसोटी सामने आणि एक टी-20 खेळण्यासाठी रवाना झाला. त्यानंतर भारतीय संघ आता मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतरही भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 वन डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय सामन्यांचं नियोजनपूर्वक वेळापत्रक तयार करावं असं खेळाडू आणि रवी शास्त्री यांचं म्हणणं आहे. सततचे दौरे आणि प्रवास यांमुळे खेळाडूंच्या फिटनेसवरही परिणाम होतो. बीसीसीआयने यावर विचार करावा. यामुळे खेळाडूंना रिकव्हर होण्यास मदत होईल, असं रवी शास्त्री म्हणाल्याचं वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
खेळाडूंच्या विश्रांतीचा विचार करा, रवी शास्त्रींची बीसीसीआयकडे मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2017 11:53 AM (IST)
शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली प्रशासक समिती, बोर्डाचे सीईओ राहुल जोहरी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना रवी शास्त्रींनी ही मागणी केल्याची माहिती आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -