जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणेला न खेळवल्याच्या निर्णयाचं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी समर्थन केलं आहे. या निर्णयामुळे कर्णधार विराट कोहली टीकेचा धनी झाला होता. विराटचं रवी शास्त्री यांनी समर्थन केलं आहे.


रहाणेचा सध्याचा फॉर्म पाहता त्याच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली, असं रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे.

भारतातील परदेश दौऱ्यांमधील सध्याचा सर्वात यशस्वी फलंदाज अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संधी देण्यात आली नाही. या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर विराट कोहलीवर टीका झाली होती.

''अजिंक्य रहाणेला खेळवलं असतं आणि त्याने चांगली कामगिरी केली नसती तर त्याच्या जागी रोहित शर्माला का खेळवलं नाही, असंच तुम्ही विचारलं असतं. आता रोहित शर्माला खेळवण्यात आलं आणि तो चांगली कामगिरी करु शकला नाही म्हणून अजिंक्य रहाणेला का खेळवलं नाही, असं विचारात आहात,'' असं म्हणत रवी शास्त्री यांनी विराटचं समर्थन केलं.

''वेगवान गोलंदाजांच्या बाबतीतही हीच बाब लागू होते. तुमच्याकडे पर्याय आहेत. संघ व्यवस्थापनाने चांगल्या पर्यायांवर चर्चा केली आणि आम्ही त्यावर ठाम होतो, त्यानुसारच संघ निवडण्यात आला,'' असंही रवी शास्त्रींनी सांगितलं.

''परदेशात तुम्ही सध्याचा फॉर्म आणि परिस्थितीला प्राधान्य देता. कोणता खेळाडू अशा परिस्थितीमध्ये लवकर सेट होऊ शकतो, यावर विचार केला जातो,'' असं रवी शास्त्रींनी सांगितलं.

''परदेशात संघात बदल करणं सोपं असतं. भारतात संघात बदल करण्याची गरज लागत नाही. कारण, परिस्थिती कशी आहे हे तुम्हाला अगोदरच माहित असतं,'' असंही रवी शास्त्री म्हणाले.