नवी दिल्ली : राष्ट्रगीतावेळी चुईंगम चावताना आढळल्याने निर्माण झालेल्या वादावर टीम इंडियाचा युवा फलंदाज परवेज रसूलने आपलं मत मांडलं आहे. खेळाला राजकारणाशी जोडू नये, असं तो म्हणाला.


कानपूरमध्ये जानेवारीत इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यापूर्वी राष्ट्रगीतावेळी परवेज रसून चुईंगम चावताना आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका करण्यात आली. शिवाय त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

क्रिकेटर्सना क्रिकेट खेळू द्यावं, त्यांना राजकारणात ओढू नये. माझं सध्या खेळावर लक्ष केंद्रित आहे. या वादांमुळे मी खेळांवर परिणाम होऊ देणार नाही, असं रसूल म्हणाला. रसूल जम्मू काश्मीरमधून राष्ट्रीय संघात स्थान मिळवणारा पहिलाच खेळाडू आहे.

आमच्या भागातील खेळाडूंना राष्ट्रीय संघात स्थान मिळवणं अत्यंत कठिण आहे. त्यातच असे वाद होतात, तेव्हा त्याचं दुःख होतं. त्यामुळे अशा घटनांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं रसूल म्हणाला.