रायपूर : आदित्य तरेच्या मुंबई संघाने हैदराबादवर 30 धावांनी मात केली आणि रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

गतवेळच्या विजेत्या मुंबई संघाने रायपूरमध्ये झालेल्या सामन्यात हैदराबादला विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं होतं. अखेरच्या दिवशी मुंबईला विजयासाठी तीनच विकेट्सची गरज होती तर हैदराबादला 111 धावा हव्या होत्या.

हैदराबादच्या सीव्ही मिलिंदने 29 धावांची तर बी अनिरुद्धने नाबाद 84 धावांची खेळी करुन आपल्या टीमच्या विजयाच्या आशा जागवल्या. दोघांनी आठव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचली. पण मुंबईचा गोलंदाज अभिषेक नायरने मिलिंदला बाद करुन ही जोडी फोडली. अभिषेकनेच मग हैदराबादचं शेपूट कापून काढलं आणि मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मुंबईकडून दुसऱ्या डावात नायर आणि विजय गोहिलने प्रत्येकी पाच विकेट्स काढल्या. या सामन्यात पहिल्या डावात मुंबईने 294 तर हैदराबादने 280 धावा केल्या होत्या. मग दुसऱ्या डावात मुंबईने 217 धावा केल्या तर हैदराबादचा डाव 201 धावांवरच आटोपला.