सूरत : रणजी करंडकाच्या इतिहासात विदर्भाने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारण्याचा पराक्रम गाजवला आहे. या स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विदर्भाने केरळचा 412 धावांनी धुव्वा उडवला.
विदर्भाला आजवरच्या इतिहासात 1970-71 आणि 1995-96 या दोन मोसमात रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती. पण यंदा फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भाच्या संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवून आपली सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.
विशेष म्हणजे मुंबईचे माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित हे विदर्भ संघाचे प्रशिक्षक आहेत.
दरम्यान, रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत विदर्भाचा सामना बलाढ्य कर्नाटकशी होईल. हा सामना 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.