रणजीचा रणसंग्राम : विदर्भाचा विजय, तर मुंबई, महाराष्ट्राचे सामने अनिर्णित
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2017 07:56 PM (IST)
रणजी करंडक स्पर्धेच्या रणसंग्रामात महाराष्ट्राच्या तीन संघांचे सामने झाले. यात विदर्भाचा दणदणीत विजय, तर मुंबई आणि महाराष्ट्राचे सामने अनिर्णित राहिले.
मुंबई : रणजी करंडक स्पर्धेच्या रणसंग्रामात महाराष्ट्राच्या तीन संघांचे सामने झाले. यात विदर्भाचा दणदणीत विजय, तर मुंबई आणि महाराष्ट्राचे सामने अनिर्णित राहिले. मुंबई विरुद्ध बडोदा सिद्धेश लाडच्या झुंजार खेळीच्या जोरावर रणजी करंडकाच्या साखळी फेरीत मुंबईनं बडोद्याविरूद्धची लढत अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. सिद्धेश लाडनं 238 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 71 धावांची खेळी करत मुंबईला पाचशेव्या रणजी सामन्यात डावाच्या पराभवापासून वाचवलं. क गटातील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. बडोद्यानं पहिल्या डावात 575 धावांचा डोंगर उभारून 404 धावांची भक्कम आघाडी मिळवली होती. तिसऱ्या दिवसअखेर मुंबईची 4 बाद 102 अशी दाणादाण उडाल्यानं बडोद्याला आज शेवटच्या दिवशी डावानं विजय मिळवण्याची संधी होती. मात्र सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक नायरच्या चिवट खेळीनं मुंबईनं 7 बाद 260 धावांची मजल मारत सामना अनिर्णित राखला. मुंबई 171 आणि 260/7, बडोदा 475/9 घोषितमहाराष्ट्र विरुद्ध रेल्वे अ गटातील महाराष्ट्र विरूद्ध रेल्वे रणजी सामना अनिर्णित राहिला. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात महाराष्ट्रानं पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुणांची कमाई केली. पहिल्या डावातील 100 धावांच्या आघाडीनंतर महाराष्ट्रानं आपला दुसरा डाव 186 धावांवर घोषित करून रेल्वेला 287 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या दिवशी खेळ संपला तेव्हा रेल्वेनं चौथ्या डावात 1 बाद 54 धावा केल्यानं हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. पहिल्या डावात शतक ठोकणाऱा महाराष्ट्राचा रोहित मोटवानी सामनावीराचा मानकरी ठरला. महाराष्ट्र 481 आणि 186/6 घोषित, रेल्वे 381 आणि 54/1 विदर्भ विरुद्ध बंगाल रणजी करंडकातील ड गटाच्या सामन्यात विदर्भनं बंगालवर दहा विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. पश्चिम बंगालच्या कल्याणी शहरात हा सामना खेळवण्यात आला. अखेरच्या दिवशी ललित यादव आणि आदित्य सरवटेच्या प्रभावी माऱ्यासमोर बंगालचा दुसरा डाव 306 धावांत संपुष्टात आला. त्यामुळे विजयासाठी विदर्भला केवळ 18 धावांचं लक्ष्य मिळालं. विदर्भनं हे लक्ष्य बिनबाद पार करत यंदाच्या रणजी मोसमातला तिसरा विजय साजरा केला. पहिल्या डावात 182 धावांची शानदार खेळी साकारणाऱ्या विदर्भच्या संजय रामस्वामीला सामनावीराचा बहुमान देऊन गौरवण्यात आलं. विदर्भ 499 आणि 18/0, बंगाल 207 आणि 306