रणजीत महाराष्ट्राच्या स्वप्निल-अंकितची विक्रमी भागीदारी
एबीपी माझा वेब टीम | 14 Oct 2016 04:18 PM (IST)
मुंबई : महाराष्ट्राच्या स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणे या जोडीने वानखेडेवरच्या रणजी सामन्यात दिल्लीवर अक्षरश: वर्चस्व गाजवलं. या सामन्यात महाराष्ट्राच्या स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणेने रणजी क्रिकेटच्या इतिहासातली आजवरची सर्वोच्च भागीदारी रचली. स्वप्निल आणि अंकितने तिसऱ्या विकेटसाठी 594 धावांची अभेद्य भागीदारी रचली. स्वप्निल-अंकित जोडीने विजय हजारे-गुल मोहम्मद जोडीचा भागीदारीचा विक्रम मोडला आहे. हजारे-मोहम्मद जोडीने 1946-47च्या रणजी मोसमात बडोद्याकडून होळकर संघाविरुद्ध 577 धावांची भागीदारी केली होती. मात्र ही भागीदारी आता इतिहासजमा झाली आहे. या सामन्यात स्वप्निल गुगळेने 521 चेंडूंत 37 चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 351 धावांची खेळी रचली. तर अंकित बावणेने 500 चेंडूंत 18 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 258 धावांची खेळी उभारली. तर रणजी करंडकात त्रिशतक करणारा स्वप्निल गुगळे हा महाराष्ट्राचा आजवरचा चौथा फलंदाज ठरला. महाराष्ट्राने 635 धावांवर पहिला डाव घोषित केला. नाणेफेक जिंकून महाराष्ट्राने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. महाराष्ट्राची सलामीची जोडी 27 धावांवर फुटली. हर्षद खाडीवले 10 धावांवर बाद झाला. तर चिराग खुरानाही (4 धावा) झटपट माघारी परतला. त्यानंतर स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणेने महाराष्ट्राचा डाव सावरत मजबूत स्थितीत नेलं.