मुंबई : मुंबईच्या अभिषेक नायरचं शतक अवघ्या नऊ धावांनी हुकलं. पण नायर आणि आदित्य तरे यांच्या जबाबदार फलंदाजीनं रणजी चषकाच्या फायनलमध्ये गुजरातसमोर 312 धावांचं आव्हान ठेवलं.

त्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रियांक पांचाल आणि समित गोहिल या सलामीवीरांनी गुजरातला चौथ्या दिवसअखेर बिनबाद 47 धावांची मजल मारुन दिली. त्यामुळे यंदाच्या मोसमात रणजी चषक कोण जिंकणार, या प्रश्नाचं उत्तर खूपच उत्कंठावर्धक बनलं आहे.

रणजी चषकाच्या फायनलवर गुजरातने पहिले दोन्ही दिवस वर्चस्व गाजवलं होतं. पण मुंबईने तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी आपली कामगिरी उंचावून हा सामना दोलायमान केला. मुंबईने तिसऱ्या दिवसअखेरच्या तीन बाद 208 धावांवरून दुसऱ्या डावात 411 धावांची मजल मारली.

कर्णधार आदित्य तरेच्या 69, अभिषेक नायरच्या 91 धावांच्या खेळींनी त्यात मोलाचा वाटा उचलला. अभिषेक नायरने तर तळाच्या चार फलंदाजांना हाताशी धरून मुंबईच्या धावसंख्येत 114 धावांची भर घातली.

रणजी चषकावर पहिल्यांदा नाव कोरायचं, तर गुजरातसमोर अखेरच्या दिवशी 265 धावांचं आव्हान आहे. मुंबईला मात्र 46व्यांदा रणजी करंडक जिंकायचा असेल, तर अखेरच्या दिवशी गुजरातचा अख्खा डाव गुंडाळावा लागणार आहे.