नवी दिल्ली: श्रीलंकेचा अनुभवी डावखुरा स्पिनर रंगाना हेराथ पाठदुखीमुळं भारत दौऱ्यातल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. त्याला या दुखापतीमुळं भारत दौऱ्यातूनच माघार घ्यावी लागली आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी कसोटी 2 ते 6 डिसेंबर या कालावधीत दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर खेळवण्यात येईल.

रंगाना हेराथऐवजी या कसोटीसाठी लेग स्पिनर जेफ्री वॅण्डरसेचा श्रीलंका संघात समावेश करण्यात आला आहे.

जेफ्री वॅण्डरसेनं ११ वन डे आणि सात ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. पण आजवरच्या कारकीर्दीत तो अजूनही कसोटी सामन्यात खेळलेला नाही.



दरम्यान, हेराथ हा श्रीलंकेचा मुख्य फिरकीपटू आहे. त्याने भारताविरुद्धच्या पहिल्या कोलकाता कसोटीत एकही विकेट घेतली नव्हती, मात्र त्याने महत्त्वपूर्ण 67 धावा केल्या होत्या. त्यामुळेच श्रीलंकेला भारतावर पहिल्या डावात 122 धावांची आघाडी घेता आली होती.

हेराथला दुसऱ्या नागपूर कसोटीतही चमकदार कामगिरी करता आली नव्हती. या कसोटीत भारताला एकदाच फलंदाजीची संधी मिळाली. त्यामुळे एका डावात हेराथने 39-11-81-1 अशी कामगिरी केली होती.