नवी दिल्ली : भारतीय महिला खेळाडू मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिले आहे. "माझ्या जीवनातील हा काळा दिवस आहे. रमेश पोवार माझे करिअर संपवण्याचा प्रयत्न करत आहेत," असा आरोप मिताली राजने केला आहे. "फलंदाजीच्या क्रमांकावरुन वाद घालत, मिताली निवृत्ती घेण्याची धमकी द्यायची," असा आरोप प्रशिक्षक रमेश पोवार यांनी आपल्या अहवालात केला होता.

विश्वचषकाच्या इंग्लंडसोबतच्या सेमीफायनल सामन्यात मितालीला बाहेर बसवण्यात आले होते. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर रमेश पोवार यांनी अहवालात मिताली राजवर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मितालीने आज तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन उत्तर दिलं. ती म्हणाली की, "मी या आरोपांमुळे खूप दु:खी झाले आहे. माझ्या देशभक्तीवर, माझ्या प्रतिभेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत."

मितालीने पोवारसह समितीच्या सदस्या डायना एडल्जीवर दुजाभाव केल्याचा आरोप लावला आहे. "डायनाने आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. तसेच प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मला अपमानित केले आहे," असे मितालीने म्हटले आहे.