मेलबर्न : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद परदेशात आंतराष्ट्रीय सामन्याला हजेरी लावणारे पहिले भारतीय राष्ट्रपती ठरले आहेत. मेलबर्नमध्ये सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांदरम्यान दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना सुरु आहे. या सामन्यावेळी राष्ट्रपतींनी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर हजेरी लावत काही वेळ सामन्याचा आनंद घेतला.
यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनदेखील उपस्थित होते. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरुन याची माहिती देण्यात आली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधील दुसरा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलदाजी करताना 19 षटकांत सात बाद 132 धावांची मजल मारली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला.
त्यानंतर भारताला 11 षटकांत 90 धावांचं सुधारीत लक्ष्य देण्यात आलं. मात्र सततच्या पावसामुळे पंचांनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे.