राजकोट : भारत आणि न्यूझीलंड संघांमधला दुसरा ट्वेन्टी 20 सामना आज राजकोटच्या स्टेडियमवर खेळवण्यात येईल. विराट कोहलीच्या टीम इंडियाने दिल्लीचा पहिला ट्वेन्टी 20 सामना जिंकून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
आता राजकोटचा सामना जिंकून, तीन सामन्यांची मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. तसं झालं तर गेल्या पाच वर्षांत भारताने जिंकलेली ही ट्वेन्टी 20 सामन्यांची तिसरी मालिका ठरेल.
टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. त्यानंतर दिल्लीच्या पहिल्या ट्वेन्टी 20 सामन्यावर भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
त्या पार्श्वभूमीवर राजकोटच्या ट्वेन्टी 20 सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड मानलं जात आहे.