मुंबई: मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर बीसीसीआयनं आयपीएलमधील दोन महत्वाचे संघ चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षाची बंदी घातली होती. दोन वर्षाच्या बंदीनंतर आता हे दोन्हीही संघ नव्या आयपीएल मोसमासाठी सज्ज झाले आहेत. 2015 साली घालण्यात आलेली बंदी अखेर आज संपली आहे.


नव्या मोसमासाठी चेन्नईनं जोरदार तयारीही सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्सचे डायरेक्टर जॉर्ज जॉन यांना धोनीच पुन्हा एकदा कर्णधारपदी हवा आहे. त्यांच्या मते, बीबीसीआयनं जर जुने खेळाडू संघात ठेवण्याची परवानगी दिली तर, आपण सर्वात आधी धोनीलाच संघात घेऊ.

आयपीएलच्या 11व्या मोसमासात चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी या दोन्ही संघाचं स्वागत केलं आहे.

चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हे दोन्ही संघ आयपीएल 9 आणि आयपीएल 10च्या मोसमात खेळू शकले नव्हते. त्यांच्याऐवजी पुणे रायझिंग आणि गुजरात लायन्स या दोन संघाचा समावेश करण्यात आला होता.

आयपीएलच्या 9व्या मौसमात चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही संघातील खेळाडूंवर पुन्हा बोली लागली होती. आयपीएलच्या 11व्या मौसमासाठी संपूर्णपणे नव्यानं बोली लावण्यात येणार आहे. त्यामुळे विराट, रैना, गेल, धोनी आणि डिव्हिलिअर्स यांच्यासारखे दिग्गज खेळाडू इतर संघांसोबत खेळताना दिसू शकतात.