Team India Won World Cup: महिलांच्या टीम इंडियाने 1978 मध्ये पहिला वर्ल्डकप खेळला. तेव्हापासून, आजतागायत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नव्हती. मात्र, रविवारी 2 नोव्हेंबर रोजी तब्बल 47 वर्षांचा दुष्काळ संपला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून भारताने पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारी शफाली वर्मा सर्वात तरुण फलंदाज ठरली. दीप्तीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. ती एकाच स्पर्धेत भारताची सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाजही ठरली. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत स्मृती मानधनाने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या.
टीम इंडियाच्या जिगरबाज कामगिरीनंतर संघावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला संघाचं जोरदार कौतुक केलं आहे. या विजयातून देशांत महिलांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक खोल रुजेल आणि फक्त क्रिकेटच नाही तर सर्व खेळांमध्ये भारतीय महिलांचं राज्य दिसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे काय म्हणाले?
राज यांनी सोशल मीडियातून संघाचं अभिनंदन करत म्हटले आहे की, भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरलं. यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन. या आधी 2 वेळा विजेतेपदाची हातातोंडाशी आलेली संधी निसटली होती पण यावेळेस मात्र देदीप्यमान कामगिरी करत त्यांनी विश्वचषक खेचून आणला. भारतीय महिला क्रिकेटला असंच यश मिळत राहील हे नक्की आणि यातूनच देशांत महिलांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक खोल रुजेल आणि फक्त क्रिकेटच नाही तर सर्व खेळांमध्ये भारतीय महिलांचं राज्य दिसेल. पुन्हा एकदा महिला भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन!
भारतीय महिला संघाने पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली
भारतीय महिला संघाने त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकली. या संघाने यापूर्वी 2005, 2017 एकदिवसीय विश्वचषक आणि 2020 टी-20 विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
स्मृती मानधनाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा
स्मृती मानधना या विश्वचषकात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा काढणारी गोलंदाज होती. तिने 9 सामन्यात 434 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड 571 धावा काढत अव्वल स्थानावर होती.
या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारी दीप्ती शर्मा
दीप्ती शर्माने या महिला विश्वचषकात 22 बळी घेतले आणि ती स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनली. दीप्तीने विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजीही गाठली. तिच्याकडे आता 35 बळी आहेत. माजी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी 43 बळींसह यादीत अव्वल स्थानावर आहे. दीप्तीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही घोषित करण्यात आले. तिने 22 बळी घेतले आणि 215 धावा केल्या. एका विश्वचषकात 20 बळी घेणारी आणि 200 पेक्षा जास्त धावा काढणारी ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली.
इतर महत्वाच्या बातम्या