बंगळुरु : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅट रेनशॉने भारत दौऱ्यावर त्याच्या दमदार फलंदाजीने स्वतःला सिद्ध केलं आहे. याशिवाय त्याने बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या स्लेजिंगचाही यशस्वीपणे सामना केला.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि विराट यांच्यातील शाब्दीक चकमकीनंतर विराटने आपला मोर्चा रेनशॉकडे वळवला. त्याने रेनशॉला पुण्यात घेतलेल्या 'टॉयलेट ब्रेक'ची आठवण करुन दिली. त्यानंतर रेनशॉलाही हसू आवरता आलं नाही.
मैदानावर घडलेल्या प्रसंगाचा मी आनंद घेत होतो. विराटकडून केल्या जाणाऱ्या कृत्यावर मला सतत हसू येत होतं. पुणे कसोटीत खेळताना मी 'टॉयलेट ब्रेक' घेतला होता, त्याचीच आठवण विराट करुन देत होता, असं रेनशॉने सांगितलं.
मॅट रेनशॉ आणि शॉन मार्श यांच्या झुंजार अर्धशतकांनी ऑस्ट्रेलियाला बंगळुरू कसोटीवर दुसऱ्या दिवशी पकड घेण्याची संधी मिळवून दिली. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या दिवसअखेर सहा बाद 237 धावांची मजल मारली असून, कांगारूंच्या हाताशी 48 धावांची आघाडी झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी मॅथ्यू वेड 25, तर मिचेल स्टार्क 14 धावांवर खेळत होता.