बदलापूर (ठाणे) : महिला दिनानिमित्त आयोजित सायकल शर्यतीदरम्यान सायकलवरून पडून 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बदलापुरात घडली आहे. श्रेया देवेंद्र म्हात्रे असे या मुलीचे नाव असून ती बदलापुरातील कात्रप विद्यालयात नववीत शिकत होती.


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बदलापुरातील सखी या संस्थेच्या वतीने रविवारी (5 मार्च) सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बदलापूर पूर्वेकडील खरवई येथे राहणारी श्रेयाही सहभागी झाली होती.

अंबरनाथ बदलापूर रस्त्यावरील डीमार्ट पासून सुरु झालेल्या या शर्यतीत सायकल चालवत श्रेया सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कात्रप भागातील एक्सीस बॅंकेसमोरील रस्त्यापर्यंत आली. तेथून पुढे जात असताना ती सायकलवरून खाली पडून गंभीर जखमी झाली.

श्रेयाच्या मागोमाग तिची आई मोटरसायकलवर येत होती. तिने तत्काळ श्रेयाला उपचारार्थ एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरु आहे.