मुंबई : क्ले कोर्टचा बादशाह स्पेनच्या राफेल नदालनं फ्रेंच ओपनमधलं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. क्ले कोर्टवर खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत नदालनं अंतिम फेरीत वर्ल्ड नंबर वन नोवाक ज्योकोविचचा अक्षरश: धुव्वा उडवला. नदालनं हा सामना तीन सरळ सेट्समध्ये जिंकून आपणच क्ले कोर्टचा राजा असल्याचं दाखवून दिलं.


नदालसमोर ज्योकोविच हतबल


नदाल आणि ज्योकोविचमधला हा अंतिम सामना पाच सेट्सपर्यंत जाईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. नदालच्या आक्रमक खेळापुढे ही अपेक्षा फोल ठरली. नदालनं पहिलाच सेट 6-0 असा एकतर्फी जिंकत ज्योकोविचवर दडपण आणलं. याच दडपणाखाली खेळताना ज्योकोविचनं दुसरा सेटही 2-6 असा गमावला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये त्यानं झुंज देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण नदालनं हाही सेट 7-5 असा आपल्या नावावर करत फ्रेंच ओपन किताबावर आपलं नाव कोरलं.


नदालचं 16 वर्षातलं तेरावं फ्रेंच ओपन विजेतेपद


नदालनं गेल्या 16 वर्षात फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठण्याची ही 13वी वेळ होती. गेल्या 12 फायनलप्रमाणेच नदालनं याही वेळी आपल्या कामगिरीचा आलेख चढताच ठेवला आणि तेरावं विजेतेपद पटकावलं. नदालनं 2005 साली पहिल्यांदाच फ्रेंच ओपन खेळताना पदार्पणातच विजेतेपद पटकावलं होतं. त्य़ानंतर 2008 पर्यंत सलग चार वेळा त्यानं किताब आपल्याकडेच राखला. 2009 साली नदाल चौथ्या फेरीतच बाहेर पडला. पण पुन्हा 2010 पासून 2014 पर्यंत नदालनं फ्रेंच ओपनमध्ये आपला दबदबा कायम राखला. 2015 आणि 2016 ची फ्रेंच ओपन नदालसाठी निराशादायी ठरली. या दोन्ही वर्षी तो अनुक्रमे उपांत्यपूर्व आणि तिसऱ्या फेरीतच बाहेर पडला. 2017 साली नदाल नव्या दमानं मैदानात उतरला. आणि त्यानंतर आजपर्यंत नदालनं फ्रेंच ओपनमध्ये आपल्या वर्चस्वाला धक्का लागू दिला नाही.


नदालची फेडररशी बरोबरी


नदालच्या आजवरच्या कारकीर्दीतलं हे विसावं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. या जेतेपदासह नदालनं रॉजर फेडररच्या सर्वाधिक विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. नदालच्या खात्यात आता तेरा फ्रेंच ओपनसह चार अमेरिकन ओपन, दोन विम्बल्डन आणि एक ऑस्ट्रेलियन ओपन असा वीस ग्रँड स्लॅम विजेतीपदांचा खजिना जमा आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदं पटकावणाऱ्यांच्या यादीत नदाल, फेडरर संयुक्त पहिल्या, ज्योकोविच (17) दुसऱ्या, तर पीट सांप्रस (14) तिसऱ्या स्थानावर आहे.