मुंबई: भारत आणि इंग्लंड दरम्यान मुंबईत वानखेडेमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत भारताचा फिरकीपटू आर. अश्विननं एक नवा इतिहास रचला आहे. एका डावात 5 बळी बाद करण्याचा विक्रम अश्विननं तब्बल 23 वेळा केला आहे. वानखडे कसोटीत दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सचा बळी घेऊन आर. अश्विननं एका डावात 5 बळी घेतले. त्यानं आतापर्यंत तब्बल 23 वेळा अशी कामगिरी केली आहे.


याआधी अशी कामगिरी टीम इंडियाचा अष्टपैलू आणि माजी कर्णधार कपिल देवनं केली होती. कपिलनं देखील 23 वेळा 5 विकेट घेतल्या होत्या. याच विक्रमाशी आता अश्विननं बरोबरी केली आहे. अश्विननं अवघ्या 43 कसोटीमध्ये हा भीमपराक्रम केला आहे. तर कपिल देवनं 131 कसोटीत ही कामगिरी केली होती.

आता अशी कामगिरी करणारे दोनच भारतीय अश्विनच्या पुढे आहेत. ते म्हणजे हरभजन सिंह आणि अनिल कुंबळे. हरभजन सिंहनं 103 कसोटीत 25 वेळा 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. तर अनिल कुंबळेनं 132 कसोटीत 35 वेळा 5 गडी बाद केले असून तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.