मुंबई : भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विननं कसोटीत आठ फलंदाजांना माघारी धाडून टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यानं या आठ विकेट्ससह कसोटी क्रिकेटमधल्या विकेट्सचं त्रिशतक साजरं केलं आणि आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला.
अश्विनच्या चेंडूनं नागपूर कसोटीत लाहिरु गमगेचा चक्क त्रिफळा उडवला आणि टीम इंडियाच्या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब केलं. नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवरच्या त्या विक्रमी विजयाचं मोठं सेलिब्रेशन होणं स्वाभाविकच होतं. पण हे सेलिब्रेशन केवळ टीम इंडियाच्या विजयाचंच नाही, तर रवीचंद्रन अश्विनच्या विक्रमाचंही आहे.
अश्विननं लाहिरु गमगेला माघारी धाडून आपल्या कसोटी विकेट्सचं त्रिशतक साजरं केलं, तेही नव्या विक्रमासह. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद तीनशे विकेट्स घेण्याचा मान आता अश्विनच्या नावावर जमा झाला आहे. त्याने अवघ्या 54 कसोटी सामन्यांमध्ये विकेट्सच्या त्रिशतकाला भोज्या केला.
याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज डेनिस लिलीच्या नावावर होता. लिलीनं 56 कसोटी सामन्यांमध्ये 300 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. 1981 साली पाकिस्तानविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत सामन्यात लिलीनं या कामगिरीची नोंद केली होती.
अश्विननं तब्बल 36 वर्षांनी नागपूर कसोटीत लिलीचा तो विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तीनशे विकेट्स घेणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. भारताच्या सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे 619 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर कपिल देव 434 विकेट्स, हरभजनसिंग 417 विकेट्स आणि झहीर खान 311 विकेट्स असा क्रम लागतो.
रवीचंद्रन अश्विननं आजवर 54 कसोटी सामन्यांमध्ये 25.07च्या सरासरीनं 300 विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत अश्विननं तब्बल सव्वीसवेळा एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. तसंच एका कसोटीत सातवेळा दहापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याच्या नावावर आहे. एका कसोटीत 140 धावांत 13 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
रवीचंद्रन अश्विननं 2011 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत पदार्पण केलं होतं. गेल्या सहा वर्षांत त्यानं अनेक मैलाचे दगड पार केले आहेत, तसंच भारताला कसोटीत विजयही मिळवून दिले आहेत. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या निमित्तानं अश्विनसमोर भारताला जिंकून देण्याचं आणखी एक आव्हान उभं आहे.