हैदराबाद : भारत विरुद्ध बांगलादेश सुरु असलेल्या हैदराबाद कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमालीचं प्रदर्शन केलं. या सामन्यादरम्यान ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विननं आपल्या कसोटी कारकीर्दीतील 250 वा गडी बाद करुन विश्वविक्रम नोंदवला. त्याने 45 सामन्यात हा विक्रम नोंदवला असून, ऑस्ट्रेलियाचे माजी जलदगती गोलंदाज डेनिस लिली यांचा विक्रम मोडीत काढला.
या सामन्यापूर्वी अश्विनला हा विक्रम नोंदवण्यासाठी दोन विकेट्सची गरज होती. यातील पहिला बळी हा शाकिब अल हसन याच्या रुपानं मिळाला. तर दुसरा बळी हा बांगलादेशचा कर्णधार मुश्फिकर रहीमच्या रुपानं मिळाला. या विकेटने अश्विनने ऑस्ट्रिलयाचे माजी क्रिकेटपटू लिली यांनाही मागं टाकलं आहे.
डेनिस लिली यांनी हा विक्रम 48 कसोटी सामन्यात केला होता. तर दक्षिण आफ्रिकेचे जलदगती गोलंदाज डेल स्टेन यांनी हाच विक्रम 49 सामन्यात नोंदवला. तसेच दक्षिण आफ्रिकेचे एलन डोनाल्ड यांनीही 50 कसोटी सामन्यात 250 गडी बाद केले.
या शिवाय हा विक्रम पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वकार युनूस आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथैया मुरलीधरन यांच्या नावावरही असून, या दोघांनीही 51 कसोटी सामन्यात हा टप्पा पूर्ण केला. तर न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडली आणि मेल्कम मार्शल यांनी 53 सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
भारतीय क्रिकेटपटूंमध्ये हा विक्रम टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक आणि फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या नावावर असून, कुंबळे यांनी हा विक्रम 55 कसोटींमध्ये आपल्या नावावर नोंदवला होता. पण आपल्या गुरुलाच मागे टाकून अश्विनने हा नवा विक्रम आपल्या नावावर केला.