बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला चायना ओपनचं विजेतेपद
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2016 02:11 PM (IST)
मुंबई : रिओ ऑलिम्पिकमधल्या भारताच्या रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूनं देशाच्या शिरपेचात पुन्हा मानाचा तुरा खोवला आहे. सिंधूने चायना ओपनचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच चायना ओपन जिंकण्याचा पराक्रम गाजवला. सिंधूनं अंतिम सामन्यात चीनच्या आठव्या मानांकित सून यूवर 21-11, 17-21, 21-11 असा तीन गेम्समध्ये विजय मिळवला. या सामन्यात सिंधूनं पहिल्या गेम सहज आपल्या नावावर केला. पण दुसऱ्या गेममध्ये सून यूनं सिंधूला कडवी टक्कर दिली. मात्र सून यूचं ते आव्हान सिंधूनं तिसऱ्या गेममध्ये मोडून काढलं. सिंधूला हा सामना जिंकण्यासाठी एक तास आणि नऊ मिनिटं संघर्ष करावा लागला. रिओ ऑलिम्पिनंतर सिंधूचं हे पहिलंच विजेतेपद ठरलं. याआधी सिंधूला डेन्मार्क आणि फ्रेन्च ओपनच्या दुसऱ्याच फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.