नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूला विमान प्रवासात इंडिगो कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागला. ज्याविरोधात तिने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. इंडिगोनेही या प्रकरणाची दखल घेत तातडीने स्पष्टीकरण दिलं आहे.
6E 608 या विमानाने 4 नोव्हेंबर रोजी मुंबईला प्रवास करताना वाईट अनुभव होता, असं म्हणत सिंधूने नाराजी व्यक्त केली. तिने यामध्ये ग्राऊंड स्टाफ अजितेशचं नाव घेतलं आहे.
''ग्राऊंड स्टाफ अजितेशने माझ्यासोबत उद्धटपणे वर्तन केलं. एअर होस्टेस सुश्री आशिमाने त्याला नीट बोलण्याचा सल्ला दिला, तर तो तिच्यावरही भडकला हे पाहून धक्का बसला. इंडिगोसारख्या प्रतिष्ठित एअरलाईन्समध्ये असे लोक काम करत असतील तर हे कंपनीची प्रतिष्ठा कमी करणारं आहे'', अशा शब्दात सिंधूने राग व्यक्त केला.
इंडिगोचं स्पष्टीकरण
''पीव्ही सिंधू 6E 608 या विमानाने 4 नोव्हेंबर रोजी मुंबईला प्रवास करत होती. तिच्याकडचं लगेज जास्त होतं, जे लगेज ठेवण्याच्या जागेसाठी योग्य नव्हतं. त्यामुळे तिला हे लगेच कार्गोमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. सर्व प्रवाशांसाठी सारखा नियम आहे.''
''जास्त लगेज असेल तर ते कार्गोमध्ये ठेवलं जातं. कारण त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. या सर्व चर्चेदरम्यान ग्राऊंड ऑपरेशन स्टाफ शांत होता. जास्त विरोध झाल्यामुळे मॅनेजर केबिनमधून बाहेर आले आणि बॅग हटवण्यासाठी तयार झाले. त्यानंतर लगेज कार्गोमध्ये ठेवलं'', असं इंडिगोने म्हटलं आहे.
सिंधूच्या खेळातील कामगिरीवर आम्हाला गर्व आहे. मात्र इंडिगोची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की, सिंधू आमच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुक करेन, असंही पुढे इंडिगोने म्हटलं आहे.