नागपूर : नागपूर पोलिसांनी प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या हत्येचा 24 तासात उलगडा केला आहे.  धक्कादायक गोष्ट म्हणजे कुटुंबीयांनीच सुपारी देऊन वानखेडे यांची हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.


55 वर्षीय प्राचार्य मोरेश्वर वानखेडे हे चंद्रपूरमधल्या टुकूम इथल्या खत्री कॉलेजमध्ये शिकवत असत. त्यांच्या हत्येप्रकरणी पत्नी अनिता, विवाहित मुलगी सायली आणि मुलीचा मित्र शुभम सहारे या तिघांना अटक केली आहे.

नागपूरच्या शुक्रवारी प्राचार्य वानखेडे यांची  तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली होती. वानखेडे शुक्रवारी नेहमीप्रमाणे दुचाकीने रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना झाले. मात्र वर्धा रोड परिसरातील निरी संस्थेसमोरील रस्त्यावर त्यांची दुचाकी पाडून तलवारीने हत्या केली.

कौटुंबिक वादातून 4 लाखांची सुपारी देऊन वानखेडे यांची हत्या घडवून आणल्याची कबुली पत्नी अनिता वानखेडे आणि मुलीने पोलिसांना दिली. त्यापैकी 20 हजार रुपये मारेकऱ्यांना देण्यात आले होते. वानखेडेंच्या मुलीच्या मित्राने भाडोत्री मारेकरी शोधण्यास मदत केली. हे मारेकरी हत्येच्या 2-3 दिवस आधी प्राचार्य वानखेडे यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते. अखेर शुक्रवारी त्यांनी वानखेडेंची हत्या केली. शुभम सहारे याची माहिती दिल्यानंतर मारेकरी निघून गेले.

प्राचार्य मोरेश्वर वानखेडे अतिशय तापट स्वभावाचे होते. घरी किंवा बाहेरही त्यांचे वाद व्हायचे. त्यांच्या या स्वभावामुळे घरातील वातावरण तणावाचं असायचं. ह्यालाच कंटाळून त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीने त्यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली.

या प्रकरणी पत्नी, मुलगी, तिचा मित्र आणि दोन मारेकऱ्यांना अटक केली असून दोन मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.

पाहा व्हिडीओ