मुंबई : रिओ ऑलिम्पिकमधील बॅडमिंटन एकेरीच्या सुवर्णपदकासाठी सिंधू आणि मरिनमध्ये रंगलेला सामना पाहण्यासाठी देशभरातील अनेक क्रीडा चाहत्यांनी टीव्हीसमोर ठाण मांडलं होतं. हा सामना म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त भारतातील सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेला स्पोर्ट्स कार्यक्रम ठरला आहे.

 
स्पेनची कॅरोलिना मरिन आणि भारताची पी. व्ही. सिंधू यांच्यात 20 ऑगस्ट 2016 रोजी हा सामना झाला. या चुरशीच्या फायनलचं थेट प्रक्षेपण भारतात अंदाजे पावणेदोन कोटी प्रेक्षकांनी पाहिल्याची माहिती स्टार इंडियानं दिली आहे. तीन गेम्समध्ये रंगलेल्या या फायनलमध्ये हार स्वीकारावी लागल्यामुळे सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं.

 

 

या रंगतदार सामन्याने प्रो कबड्डी लीग(पीकेएल) 4 ची फायनल, युरोपियन फुटबॉल लीग( यूईएफए) आणि विम्बल्डनच्या पुरुष फायनल सामन्यालाही व्ह्यूअरशीपमध्ये मागे टाकलं आहे.
टेलिव्हिजन कार्यक्रमांचा प्रेक्षकवर्ग मोजण्यासाठी सध्या बार्क ही नवी पद्धती लागू करण्यात आली आहे. सदर पद्धती लागू झाल्यानंतर कॅरोलिना मरिन आणि सिंधूमधली फायनल हा स्पोर्टस चॅनेलवरचा क्रिकेटव्यतिरिक्त सर्वाधिक रेटिंग मिळालेला पहिला क्रीडात्मक कार्यक्रम ठरला आहे.