चंदीगड: आयपीएलच्या मैदानात मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 15 धावांनी पराभव केला.


या पराभवामुळे पंजाबची मालकीण अभिनेत्री प्रिती झिंटा चांगलीच नाराज झाली. इतकंच नाही तर या पराभवानंतर तिची आणि पंजाबचा मेण्टॉर वीरेंद्र सेहवागची वादावादीही झाली.

या वादामुळे दुखावलेला सेहवाग पंजाब संघाचं मेण्टॉरपद सोडू शकतो. 

काय आहे नेमकं प्रकरण?

राजस्थान रॉयल्सने पाचव्यांदा किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला. या सामन्यात के एल राहुलची वादळी खेळी वगळता, पंजाबचा दुसरा कोणताही फलंदाज टिकू शकला नाही.

या पराभावामुळे प्रितीने संघाच्या ‘रन’नीतीवरुन सेहवागशी हुज्जत घातल्याचं सांगण्यात येत आहे. या सामन्यानंतर प्रिती सेहवागसोबत मैदानात बोलत होती, त्याचवेळी तिच्या चेहऱ्यावरची नाराजी दिसत होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार “सामना संपल्यानंतर खेळाडू मैदानातून बाहेर येण्यापूर्वीच, प्रिती झिंटा सेहवागजवळ गेली. तिथे तिने सामन्याची रणनीती आणि तंत्राबद्दल खड्या आवाजात विचारणा केली”

अश्विनला करुण नायर आणि मनोज तिवारी यांच्या आधी तिसऱ्या नंबरवर पाठवण्याचा जाब प्रिती विचारत होती. या सामन्यात अश्विन शून्यावर बाद झाला.  त्यामुळे फलंदाजीतील अनावश्यक बदलामुळेच संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला सेहवागची रणनीती जबाबदार आहे, असं प्रितीचं म्हणणं आहे.

सामना गमावल्यामुळे प्रिती दु:खी होतीच, पण तिचं दु:ख कमी आणि कोणत्या तरी एका मुद्द्यावरुन ती सेहवागशी हुज्जत घालताना दिसत होती.

सेहवागही प्रितीचं म्हणणं अत्यंत गंभीरपणे ऐकत होता.

सेहवाग 5 वर्षांसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत मेण्टॉरच्या भूमिकेत असेल. प्रिती झिंटा, नेस वाडिया आणि उद्योगपती मोहित बर्मन हे या संघाचे मालक आहेत.

मात्र या प्रकारामुळे सेहवाग किंग्ज इलेव्हन पंजाबला रामराम ठोकू शकतो.

सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या 

केएल राहुलच्या झुंजार खेळीनंतरही पंजाबचा पराभव