'यू मुंबा'त मोठे फेरबदल, मोहित चिल्लर सर्वात महागडा !
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2016 08:47 AM (IST)
मुंबई : आयपीएलप्रमाणे प्रो कबड्डीच्या लिलावातही खेळाडूंना चांगली रक्कम मिळत आहे. प्रेक्षकाच्या पसंतीस उतरलेल्या प्रो कबड्डीचे खेळाडूही आता मालामाल होताना दिसत आहेत. प्रो कबड्डीच्या चौथ्या हंगामासाठी शुक्रवारी लिलाव पार पडला. यंदा यू मुंबा संघातील खेळाडू मोहित चिल्लर सर्वात महागडा खेळाडू ठरला. मोहितसाठी त्याची पहिली टीम बंगळुरु बुल्टनेच तब्बल 53 लाख रुपयांची रक्कम मोजली. महत्त्वाचं म्हणजे यावेळी 'यू मुंबा'च्या संघात मोठे फेरबदल झाले आहेत. यू मुंबा यू मुंबाच्या संघात कर्णधार अनुपम कुमार आणि रिशांक देवाडिगा हे कायम राहिले. याशिवाय राकेश कुमारलाही यू मुंबाने कायम ठेवलं आहे. तर पटना पायरेट्सचे गुरुविंदर सिंह, सुनील कुमार, पुणेरी पलटनचा मनोज धुल्ल, जीवा कुमार अशी यू मुंबाची टीम असेल. यू मुंबातून कोण कोण बाहेर? 'यू मुंबा'तून भरवशाचा फलंदाज शब्बीर बापू, विशाल माने यासारखे महत्त्वाचे खेळाडू दुसऱ्या संघातून खेळताना दिसतील. शब्बीर बापू जयपूर पिंक पँथर्समध्ये, तर विशाल माने बंगाल वॉरियर्सच्या ताफ्यात दिसेल. खेळाडूंवर 15.61 कोटी रुपयांचा लिलाव यावेळी 198 खेळाडूंना बोलीसाठी उतरवण्यात आलं. त्यापैकी केवळ 96 खेळाडूंवर तब्बल 15.61 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. मोहित चिल्लरची 12 लाख रुपये बेस प्राईस होती, मात्र त्याचा भाव वधारला. त्यामुळे बंगळुरुला त्याच्यासाठी 53 लाख रुपये मोजावे लागले. यानंतर दुसऱ्या क्रमांकाची बोली संदीप नरवालवर लागली. पटणा पायरट्सच्या संदीप नरवालसाठी तेलगु टायटन्सने 45.50 लाख रुपये मोजले. इराणची अत्राचली सर्वात महागडा परदेशी खेळाडू या लिलावादरम्यान 15 देशातील 46 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यावेळी इराणच्या फजल अत्राचलीला पटणा पायरेट्सने 38 लाखात खरेदी केलं. तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. गेल्या हंगामात तो यू मुंबाचा सदस्य होता. बंगाल वॉररियर्सने दक्षिण कोरियाच्या जांग कुन लीसाठी 22 लाखांची बोली लावून आपल्या संघात कायम ठेवलं.