Pro Kabaddi League 2019 : यू मुंबाची जोरदार मुसंडी, पुणेरी पलटनवर मात
एबीपी माझा वेब टीम | 27 Jul 2019 11:21 PM (IST)
प्रो कबड्डी लीग 2019 स्पर्धेत आज यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटन असा सामना रंगला. या सामन्यात यू मुंबाने पुणेरी पलटनवर 33-23 अशी सहज मात केली.
मुंबई : प्रो कबड्डी लीग 2019 स्पर्धेत आज यू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटन असा सामना रंगला. या सामन्यात यू मुंबाने पुणेरी पलटनवर 33-23 अशी सहज मात केली. यू मुंबाच्या सुरिंदर सिंह आणि फझल अत्राचली या दोघांनी सामन्याचे पहिले सत्र गाजवले. आजच्या सामन्यात दोन्ही संघांचे बचाव क्षेत्र भक्कम असल्याचे जाणवले. यू मुंबाने 13 टॅकल पॉईंट्स (बचाव) कमावले तर पुणेरी पलटनने 12 टॅकल पॉईंट्स कमावले. रेडिंगमध्ये (चढाई)यू मुंबाचा संघ पुणेरी पलटनवर भारी पडला. मुंबईच्या रेडर्सनी 15 रेडिंग पॉईंट्स मिळवले तर पुण्याच्या रेडर्सनी केवळ 12 पॉईंट्स मिळवले. यू मुंबाच्या अभिषेक सिंह आणि अर्जुन देशवाल या दोघांनी प्रत्येकी 5 रेडिंग पॉईंट्स मिळवले आणि रोहित बलियानने 4 रेडिंग पॉईंट्स मिळवले. तर पुण्याकडून सुशांत सैलने सर्वाधिक 3 रेडिंग पॉईंट्स मिळवले. यू मुंबाने दोनवेळा पुणेरी पलटनचा पूर्ण संघ बाद केला होता. त्याचे चार पॉईंट्स मिळाले. अभिषेक सिंह, रोहित बलियान, सुरींदर सिंह, संदीप नरवाल आणि फझल अत्राचली यांनी सामना यू मुंबाच्या बाजूने फिरवला. तर दुसऱ्या बाजूला पुण्याच्या सुरजीत सिंह, पवन कॅडियन, संकेत सावंत यांची झुंच अपयशी ठरली.