अहमदाबाद : तामिळ थलायवाज संघाने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या मोसमात फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत देत मंगळवारी अहमदाबादमधील झोन बीच्या सामन्यात तेलुगू टायटन्सवर 27-23 अशी मात केली. पीकेएलमध्ये तामिळ थलायवाजने तेलुगू टायटन्सवर मिळवलेला हा पहिला विजय आहे.


तामिळ थलायवाज संघाकडून अजय ठाकूरने सर्वाधिक आठ पॉईंट्स मिळवले तर मनजीत छिल्लरने तीन महत्त्वाचे टॅकल पॉईंट्स मिळवले. तेलुगु टायटन्सतर्फे राहुल चौधरीने आठ गुणांची कमाई केली, पण त्यांच्या बचावफळीने निराशा केली.

द एरेना बाय ट्रान्स्टाडिया स्टेडियममध्ये दोन्ही संघांनी संयमी सुरुवात केली. तेलुगू टायटन्सचा स्टार रेडर राहुल चौधरीने पहिल्या पाच रेडमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्यात त्याने दोन पॉईंट्स मिळवले. मात्र तामिळ थलायवाजने तेलुगू टायटन्सचा बचाव भेदला आणि पहिल्या दहा मिनिटांनंतर 8-4 अशी आघाडी घेतली.

पहिल्या हाफमध्ये टायटन्सला ऑलआऊट करण्यात थलायवाजला यश मिळालं आणि संघाने 18-10 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये पुन्हा पुनरागमन करण्याच्या इराद्याने तेलुगू टायटन्सचा संघ मैदानात उतरला. मोहेशन.एमने पहिल्या रेडवर पॉईंट मिळवत संघाच्या कमबॅकची अपेक्षा वाढवली. मात्र तामिळ थलायवाज कोणत्याही दबावात न येता संयमी खेळ केला आणि आघाडी कायम ठेवली. अष्टपैलू मनजीत छिल्लरने बचावात दमदार खेळ करत संघाला विजयपथावर नेलं.