ब्रिस्बेन : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या तीन ट्वेन्टी 20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून ब्रिस्बेनमधून सुरुवात होत आहे. भारतीय वेळेनुसार पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल. येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन ट्वेन्टी 20, चार कसोटी आणि तीन वन डे सामन्यांच्या मालिका खेळणार आहे.


विराट कोहलीची टीम इंडिया आणि अॅरॉन फिंचची ऑस्ट्रेलियन फौज मालिकेतल्या पहिल्या ट्वेन्टी सामन्याच्या निमित्तानं एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

आयसीसीच्या ट्वेन्टी ट्वेन्टी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानी. त्यामुळे ट्वेन्टी ट्वेन्टीच्या या लढाईत क्रिकेटरसिकांना तुल्यबळ लढतीची अपेक्षा राहिल.

टीम इंडियानं नुकत्याच मायदेशात झालेल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं होतं. पण भारतीय खेळपट्टया आणि ऑस्ट्रेलियन खळपट्ट्यांमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे या मालिकेत कांगारुंविरुद्ध ठोस रणनीती आखणं विराट कोहली आणि भारतीय संघव्यवस्थापनासमोरचं मोठं आव्हान ठरणार आहे.

ट्वेन्टी 20 : ऑस्ट्रेलियन भूमीवरील टीम इंडियाची कामगिरी

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर आजवर सहा लढती खेळवण्यात आल्या आहेत. त्यात चार वेळा टीम इंडियानं बाजी मारली आहे. तर केवळ दोनच ट्वेन्टी 20 ऑस्ट्रेलियाला जिंकता आल्या आहेत. त्यामुळे ट्वेन्टी 20 सामन्यातली कांगारुंविरुद्धची हीच कामगिरी टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल.

टीम इंडियाची जमेची बाजू

ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेसाठी अनुभवी आणि युवा खेळाडूंचा भरणा ही भारतीय संघाच्या दृष्टिने जमेची बाजी ठरु शकते. भारताच्या फलंदाजीची धुरा प्रामुख्यानं रोहित शर्मा, कर्णधार कोहली, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर असेल. रिषभ पंत आणि दिनेश कार्तिकमुळे भारताची मधली फळीही मजबूत मानली जात आहे. याशिवाय भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, उमेश यादवच्या वेगवान माऱ्यासह कुलदीप आणि यजुवेंद्रची फिरकी महत्वाची भूमिका बजावणारी ठरेल.

ऑस्ट्रेलियन खेळपट्टया

आगामी कसोटी मालिकेच्या दृष्टिनं ही ट्वेन्टी 20 मालिका महत्वाची ठरणार आहे. भारतीय शिलेदारांना ऑस्ट्रेलियन खेळपट्टया आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी ही मालिका फायद्याची ठरणार आहे. ऑस्ट्रेलियातल्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर खेळणं नेहमीचं आव्हानात्मक असतं. त्यात तिथल्या खेळपट्ट्यांवर उंचपुऱ्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा वेग हा कमालीचा असतो.

या सर्व कारणांमूळे टीम इंडियासाठी हा दौरा म्हणजे खरी आग्निपरिक्षाच ठराणार आहे. या परीक्षेत आता विराटसेना कशी कामगिरी बजावतेय याकडेच साऱ्या क्रिकेटरसिकांचं लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी 20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

…मग टीम इंडियावरच निशाणा का? : रवी शास्त्री