सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्याआधी टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडलेडमधील पहिल्या कसोटीला मुकावं लागणार आहे. सराव सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला पहिल्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरु होत आहे.

पृथ्वी शॉला गंभीर दुखापत, भारताची चिंता वाढली


सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पृथ्वी शॉला गंभीर दुखापत झाली. सीमारेषेवर झेल पकडण्याच्या प्रयत्नात पृथ्वीच्या डावा घोटा दुखावला. दुखापत गंभीर असल्याने त्याला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे.


नेमकं काय झालं?

सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉला इजा झाली. पृथ्वी डीप-मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याने सीमारेषेच्या आत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीरी मॅक्स ब्रायंटचा झेल टिपला. बॉल मैदानात फेकत असताना तो घसरला आणि त्याच्या घोट्याला इजा झाली. पृथ्वी शॉ वेदनेने कळवळत होता. यानंतर भारतीय संघाचा मेडिकल स्टाफ तातडीने तिथे पोहोचला. प्राथमिक उपाचरानंतर शॉच्या दुखापत काहीच सुधारणा न झाल्याने त्याला रुग्णालयात नेलं. स्कॅन रिपोर्टमध्ये पृथ्वीची दुखापत गंभीर असल्याचं समोर आलं आहे.