विक्रमी भागीदारी
पृथ्वी शॉचं शतक 6 धावांनी हुकलं असलं तरी त्याने मंजोतसोबत रचलेली 180 धावांची भागीदारी हा एक मोठा विक्रम आहे. या जोडीने रॉबिन उथप्पा आणि शिखर धवनच्या 175 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला, जो 2004 च्या विश्वचषकात करण्यात आला होता. मंजोतने 99 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या.
फलंदाजी पाहून दिग्गजांकडून कौतुक
क्रिकेट कारकीर्दीच्या सुरुवातीलाच पृथ्वी शॉ चर्चेत आला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने पाच शतकं नावावर केली. मात्र आयसीसीच्या मोठ्या टूर्नामेंटमध्ये खेळण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पृथ्वी शॉने असे काही शॉट खेळले, ज्यामुळे अनेकांना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आठवण झाली.
त्याचा कव्हर ड्राईव्ह शॉट पाहून तर वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर इयन बिशॉप यांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि ‘हा तर तेंडुलकर आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. अनेक चाहत्यांनाही पृथ्वी शॉची फलंदाजी पाहून सचिनची आठवण आली. पृथ्वी शॉ सचिनला आदर्श मानतो आणि त्याच्यासारखाच क्रिकेटर बनण्याची त्याची इच्छा आहे.